न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे डॉक्टरांकडून दिव्यांगांची तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे सध्या बंद आहे. त्यामुळे दिव्यांगांना पीएमपीएल बस प्रवास पासचा लाभ घेता येत नाही. दिव्यांगांच्या सोईसाठी प्रमाणपत्राशिवाय बस पास देण्याचा निर्णय स्थायी समितीने नुकताच घेतला आहे. त्यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्राशिवाय बस पास उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना पीएमपीएल बसमधून मोफत प्रवास पास दिला जातो. त्यासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटींच्या निधीची तरतूद आहे. पाससाठी शासकीय रुग्णालयाचे दिव्यांग प्रमाणपत्र बंधनकारक आहे. शहरातील सुमारे ४ हजार दिव्यांग बस पासचा लाभ घेतात.
कोरोना संसर्गामुळे डॉक्टरांकडून तपासणी करून प्रमाणपत्र सध्या दिले जात नाही. त्यामुळे दिव्यांगांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समितीने तसा ठराव सभेत ऐनवेळी मंजूर केला आहे.