न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने सोमवारी (दि. १२) निगडीतील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वारंवार निदर्शने, निवेदन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर काळे यांनी दिला आहे.
तहसीलदार गीता गायकवाड यांना या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
याबाबत निवेदन, निदर्शन, बैठका घेवूनही सरकार दखल घेत नसल्याने तहसील कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले. रिक्षा व्यवसायावरील निर्बंध हटवावे, आर्थिक पॅकेज द्यावे, मुक्त परवाना बंद करावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. यावर निर्णय न झाल्यास कुटुंबासह जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.


















