न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोघांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४७८ (१), ४३३ (क) व मुंबई प्रांतिक महानगर पालिका अधिनियम कलम ३७९ (अ) (१) (ब) नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
अनधिकृत बांधकामप्रश्नी महापालिकेकडून नोटीस बजावूनही संबंधितांनी बांधकाम काढून न घेतल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांनी राहत्या घराचे बांधकाम अनधिकृतपणे केले आहे. नोटीस बजावूनही घराचे अनधिकृत बांधकाम काढले नाही. त्यामुळे कमलाकर बळीराम ढोबळे (रा. मोरया कॉलनी विजयनगर, काळेवाडी) तर, तस्लीनमुन निशा अब्दुल रहेमान खान (रा. कोकणेनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपअभियंता नितीन रामचंद्र निंबाळकर यांनी दोन्ही प्रकरणात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.