न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात बायामेडिकल वेस्टचे ( जैव वैद्यकीय कचरा ) संकलन करून त्याचे मोशी कचरा डेपो प्रकल्पात विल्हेवाट लावण्याचे काम पास्को इन्व्हायरोमेंटल सोल्युशन प्रा. लि. कंपनीस १५ वर्षांसाठी थेट पद्धतीने देण्यास सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा विरोध असतानाही सत्ताधारी भाजपने बळाच्या जोरावर मंजुरी दिली.
त्यावरून नगरसेवकांनी आयुक्तांच्या हौदासमोर गोंधळ घातला. त्यावेळी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका व आयुक्तांमध्ये वाद झाला. मंगळवारी (दि.१३) झालेल्या व्हिडिओ कॉन्फरसन्सद्वारा झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे तो विषय होता. मागील १५ वर्षे काम केले म्हणून पुढे १५ वर्षे थेट पद्धतीने काम देण्यास भाजपसह राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला. तसे केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा दम भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्तांना भरला.
पक्षनेत्यांवर दबाव टाकून हा विषय मंजुर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांनी केला. कामाची मुदत संपल्यानंतर निविदा का काढली नाही, असा सवाल भाजपच्या आशा शेंडगे यांनी उपस्थित केला. आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे यांनी यावर खुलासा केला. या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाचा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी विषय मंजुर झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे विरोधकांनी आयुक्तांच्या आसनासमोर जमा होऊन गोंधळ घातला. हा विषय मंजुर न करण्याची मागणी लावून धरली.