न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे या बेजाबदार अधिकारी असून, त्यांची शासनाकडे बदली करण्याची मागणी पुन्हा महापालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आली. पालिका शाळांच्या दर्जा वाढविण्यापेक्षा अधिकाऱ्यांना ठेकेदार पोसण्यात अधिक रस असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सभागृहात केला.
पालिकेच्या मंगळवारी ( दि .१३ ) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. काळभोरनगर येथील शाळा खासगी संस्थेला चालविण्यास देण्याच्या प्रस्तावावरून शिक्षण विभागाच्या अधिकारी, शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सभागृहात वाभाडे काढण्यात आले. शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शिक्षण समिती स्थापन होऊनही ज्योत्स्ना शिंदे यांचा मनमानी कारभार कायम आहे. त्या समिती सदस्यांसह नगरसेवकांचे ऐकत नाहीत. त्यावर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे त्यांना परत शासन सेवेत पाठवून द्यावे, अशी मागणी सभागृहात दुसऱ्यांदा करण्यात आली.
या पूर्वी या बाबत झालेला ठराव मागे घेण्यात आला होता. सर्वाधिक वेतन असून शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणांकडे लक्ष देत नाहीत. शाळेत हजेरी लावून पुन्हा घरी जाणाऱ्या काही शिक्षका असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. कामासाठी अनेकजण दररोज ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास करतात. मात्र, शिक्षकांना ५ ते १० किलोमीटरचा प्रवास करण्याचा जीवावर येते. काही शिपाई बदलीसाठी शिक्षकांकडून ठराविक रक्कम घेतात. शाळाचा दर्जा सुधारणेकडे लक्ष न देता अधिकारी केवळ ठेकेदार पोसण्यात व्यस्त आहेत. त्यांना काम कसे मिळेल, यासाठी शिक्षण विभाग राबत असतो, असा गंभीर आरोप करण्यात आला. दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची दर ३ वर्षांनी बदली करावी. शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. शिक्षण विभागासाठी सक्षम व कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दरमहा चर्चा घडवावी. पालिकेस शाळा चालविता येत नसल्यास सर्व शाळा योग्य दर्जाच्या खासगी शैक्षणिक संस्थांना चालविण्यास द्याव्यात, असे अनेक सल्ले नगरसेवकांनी दिले.
चर्चेत अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, हर्षल ढोरे, मीनल यादव, वैशाली काळभोर, स्वाती काटे, प्रमोद कुटे, राहुल जाधव, सीमा साळवे, मनसे गटनेते सचिन चिखले, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, उपहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पक्षनेते नामदेव ढाके, महापौर उषा ढोरे यांनी सहभाग घेतला.


















