- नगरसेवकांनी शिक्षकांचे काढले वाभाडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर येथील माध्यमिक शाळेत ‘ आय टीच ‘ संस्थेच्या वतीने आठवी ते दहावीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडला होता. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत फेटाळून लावण्यात आला आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. भोसरीतून १२ किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी काळभोरनगर शाळेत कसे येणार, सर्वसामान्य पालकांना हा प्रवास खर्च पेलणारा नाही. भोसरीत इंग्रजी माध्यमाची शाळा का सुरू करण्यात आली नाही. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात का घेतले गेले नाही, असे मुद्दे उपस्थित करीत, सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर यांनी या विषयाला विरोध करीत शिक्षण विभागाचे वाभाडे काढले. महापालिका कोट्यवधी रूपये शाळा व शिक्षकांवर खर्च करीत आहे. सीएसआर निधीतून पालिका प्रशासन स्वत: का शाळा सुरू करत नाही. खासगी संस्थेच्या हवाली शाळा देऊन शिक्षण विभाग आपली जबाबदारी झटकत आहे, असा आरोप करण्यात आला.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा केल्याने हा चांगला प्रस्तावावर शंका निर्माण झाल्या आहेत.
शहरातील चांगल्या शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन पालिका शाळांचा दर्जा वाढविण्याबाबत प्रयत्न करावेत. तसेच, एक स्वतंत्र सल्लागार समिती स्थापन करा, असा सल्ला उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिला.
तज्ज्ञांची मदत घेऊन चर्चा करून निर्णय घेतला जावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिला. सर्व सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावावा, असा आग्रह धरला. त्यानुसार महापौरांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. शिक्षण समितीकडून मंजुर झाल्यानंतर या विषयाचे सभागृहात सादरीकरण केले जावे, असा सूचना महापौरांनी आयुक्तांना केल्या.