- महापौर उषा ढोरेंकडून आयुक्त हर्डीकरांना पालिकेच्या शिक्षकांच्या बदलीचे आदेश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीत महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण मिळत नसेल तर, हे दुर्दैव आहे. ज्ञानदानात शिक्षक व अधिकाऱ्यांची मुजोरीव निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. सर्व शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांची दर ३ वर्षांनी बदली केली जावी, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सर्वसाधारण सभेत दिले.
त्यामुळे एकाच शाळेत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई व इतर कर्मचाऱ्यांची बदली होणार आहे. परिणामी, त्यांच्या मक्तेदारी आणि गैरकारभारास चाप बसणार आहे. सभागृहात शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केली. त्यानंतर महापौरांनी वरील आदेश दिले.
महापौर म्हणाल्या की, पालिका शिक्षण विभागावर दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करते. त्याप्रमाणात शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे सोडून वैयक्तिक कामे करत फिरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करा. तसेच, बदलीसाठी शिक्षकांकडून रक्कम घेणाऱ्या एजंट शिपायावरही कारवाई झाली पाहिजे. शाळांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची मुजोरी मोडून काढण्यासाठी त्यांची दर ३ वर्षांनी सक्तीने बदली करा, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. तसेच, प्राथमिक व शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचारी तसेच, गुणवत्ता आदीबाबतचा संपूर्ण अहवाल तयार करून तो सभागृहासमोर सादर करण्याचे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले.