न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी विकासाच्या नावाखाली केलेल्या दौऱ्यांचा नागरिकांना हिशोब द्यावा व पिंपरी चिंचवड शहरात या दौऱ्याची फल निष्पत्ती काय झाली? याची माहिती द्यावी, याकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ युरोपच्या बार्सिलोना दौऱ्यावर ‘स्मार्ट सिटीचा अभ्यास दौरा’ या गोंडस नावाखाली जाऊन आले. या व विविध प्रकारच्या दौऱ्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांनी गेली २५ ते ३० वर्षे महापालिकेच्या तिजोरीमधून दौऱ्यासाठी कोट्यावधीची उधळपट्टी केली आहे. या दौऱ्यातून शेवटी काय निष्पन्न होते. त्या देशातल्या कोणत्या पायाभूत सुविधा सत्ताधारी व प्रशासन शहरात राबवितात.
सत्ताधारी भाजपने सत्तेवर आल्यापासून दीड वर्षात एकूण १६ अभ्यास दौऱ्यांवर कोट्यावधीची उधळपट्टी केली आहे. हा अभ्यास दौरा की महापालिकेची सहल? असा प्रश्न शहरातील नागरिक विचारतात. स्मार्ट सिटीसाठी दौरा, शिक्षणासाठी दिल्ली दौरा व आदी दौरे महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून स्त्ताधारी व प्रशासनाने केलेले आहेत. महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीचे पतीराज ठेकेदाराला टक्केवारीसाठी मारहाण करतात, महापालिकेचे सुभेदार शहराचे दोन भाग करून विकासकामात रिंग करून पालिकेचे लचके तोडतात. या बाबींकडे आयुक्तांनी लक्ष द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त या नात्याने श्रावण हर्डीकर यांनी आतापर्यंत केलेल्या दौऱ्यांचे फलित काय? शहरास त्याचा काय लाभ झाला? याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना त्याची सविस्तर माहिती द्यावी, असे संदेशकुमार नवले यांनी निवेदनात नमूद केले आहे.












