न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, शहरातील कष्टकरी, सर्व-सामान्य गोरगरीब नागरिक व विद्यार्थी वर्ग या अवैध धंद्याकडे आकर्षिला जात आहे. या प्रकारामुळे संसाराची राखरांगोळी होत आहे. अनेक महिलांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत. याची दखल घेत बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांना शहरातील विविध ठीकाणी चालू असलेल्या अवैध धंद्यांची पुराव्यासहित माहिती दिली आहे व या प्रकारास आळा बसविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात विविध ठिकाणी मटका व्यवसाय तेजीत असून त्यात पिंपरी पोलीस स्टेशनअंतर्गत संत तुकारामनगर, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत महात्मा फुलेनगर झोपडपट्टी व गवळीनगर वसाहत परिसर, चाकण पोलीस स्टेशनअंतर्गत मोशी टोलनाका, निगडी पोलीस स्टेशनअंतर्गत स्पाईन रोड, दत्तवाडी आकुर्डी, चिखली पोलीस स्टेशनअंतर्गत स्पाईन रोड, साने चौक, मोरे वस्ती, वाकड पोलीस स्टेशनअंतर्गत रावेत, पुनावळे, चिंचवड पोलीस स्टेशनअंतर्गत बिजलीनगर, वेताळनगर, चिंचवड स्टेशनमधील मालधक्का परिसरात मटका व जुगार आदी अवैध धंदे बिनबोभाट चालू आहेत.
यामुळे गुंडगिरीला प्रोत्साहन मिळून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तरी, पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करून अवैध धंदे बंद करावेत. अन्यथा, संघटनेच्या माध्यमातून व समविचारी संघटनांची मोट बांधून, आपल्या कार्यालयासमोर गुरुवार (दि. १३) रोजी जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे, निसर्गंध यांनी निवेदनात म्हटले आहे.












