न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात येऊन महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. यातील तीन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ५० हजार रुपयांच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाख युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
अमरेश किसन चव्हाण (वय १९, रा. सध्या डुडुळगाव, मोशी, मूळ रा. कर्नाटक), किरण नुरसिंग राठोड (वय २०, रा. वडगाव, ता. मावळ, मूळ रा. कर्नाटक), करण अर्जुन कु-हाडे (वय १९, रा. साई समर्थनगर, वडगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपींना रविवारपर्यंत (दि. १८) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळेवस्ती येथून ३ सप्टेंबर रोजी दोन बुलेट चोरीला गेल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाइल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावरून आरोपींचा माग काढून आरोपी अमरेश चव्हाण याला मोशी येथून तर, इतर आरोपीना तळेगावमधून ताब्यात घेतले.
कर्नाटक राज्यातील दोन साथीदारांसह पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरामधून आरोपी यांनी दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. महागड्या दुचाकी चोरी करून कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील देवदुर्गा येथे विक्रीसाठी नेऊन ठेवल्याचे उघड झाले. त्यानुसार साडेसात लाखांच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. चिखली, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, पिंपरी या पोलीस ठाण्यांतील विविध सात गुन्हे उघडकीस आले.


















