न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व तमाम कोळी, आग्री, सिकेपी, सोनार समाजाची कुलस्वामिनी कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरात पहाटे विधिवत देवीचा अभिषेक करत घटस्थापना करण्यात आली. तसेच, देवस्थान प्रशासकीय समिती, पुजारी, गुरव व भाविकांच्या उपस्थितीमध्ये देवीची सकाळची आरती संपन्न झाली.
लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी कार्ला गडावर आईचा शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न होतो. यावर्षी कोरोना या वैश्विक महामारीमुळे देवस्थाने बंद असल्याने कार्ला गडावर प्रशासकीय समितीच्या आवाहनाप्रमाणे व नोंदणी झालेल्या तीन भाविक दाम्पत्यांच्या हस्ते देवीचा अभिषेक पार पडला. यानंतर प्रशासकीय समितीचे सरपंच चंद्रकांत देवकर, पुजारी संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी नवनाथ दशमुख, काळूराम देशमुख, विजय देशमुख, अभिषेकाचे मानकरी चंद्रकांत देवकर यांच्यासह सुनील पोलीस पाटील अनिल पडकळ व इतर गुरव प्रतिनिधी यांच्या हस्ते देवीचे घट बसविण्यात आले.
देवस्थाने बंद असली तरी मुंबई , ठाणे , नवी मुंबई भागातील काही भाविक मध्यरात्रीपासून मंदिराच्या प्रवेशद्वाजवळ येऊन बसले होते . पहाटेपासून पायथ्याजवळ पोलीस बंदोबस्त तैनात होता. ज्या भाविकानी अभिषेकासाठी अगाऊ नोंदणी केली आहे. त्यांना पहाटे गडावर प्रवेश दिला जाणार आहे. याची भाविकानी नोंद घ्यावी, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय मुळीक यांनी सांगितले.
















