- १०० एम. जीसाठी २३६० रुपये अंतिम किंमत; ग्राहकांनी एक रुपयाही वरती देऊ नये – विजय पाटील….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- गेल्या ७ माहिन्यापासून देश कोरोना महामारीशी दोन हात करीत आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या विळख्यात सर्वात जास्त अडकले आहे. सर्वच प्रमुख शहरात आणि उपनगरांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पिंपरी चिंचवड शहरात ही संख्या लाखाच्या जवळ पोहचलेली असून दरोरोज शेकडो रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या संक्रमनामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड १९ बाधित रुग्णाची संख्याही वाढत चाललेली आहे. अश्या प्रसंगी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. ह्या गंभीर संकटातही काही औषध विक्रेते दुपट्ट किंमतीमध्ये रुग्णांच्या नातलगांना ही इंजेक्शने विक्री करीत आहेत. सदर बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे.
या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महत्वपूर्ण आदेश (क्रमांक कोरोना २०२०/प्रक्र ९७/आ.५ – दिनांक १४/१०/२०२०) निर्गमित केलेला आहे. तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निश्चित किंमत रुपये २३६०/- अशी करण्यात आली आहे. या बाबतच्या स्पष्ट सूचना राज्यातील सर्व जिल्हाअधिकारी व आयुक्त यांना आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.
आदेशामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी म्हटले की, सदरचे इंजेक्शन निश्चित दराने फार्मसी मध्ये उपलब्ध होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे काही खाजगी औषध केंद्रांची नियुक्ती केली असून त्यांचा विभाग कार्यालय पत्ता व फोनसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. समाविष्ट कंपन्यांकडून एकूण ५००० इंजेक्शने पुरवण्यात येतील. दैनंदिन साठा व वाटप ह्याचे पूर्ण नियंत्रण प्रशासन सांभाळेल.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सचिव डॉ. व्यास यांच्या आदेशाप्रमाणे शहरातील आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांची मोठी जबाबदारी वाढलेली आहे. रुग्णांना आणि निश्चित दरात रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची दक्षता आता महापालिका आरोग्य विभागाने घेणे गरजेचे आहे. नागरिकांनीही अतिरिक्त शुल्काची कोणी मागणी करत असेल तर त्या बाबतची तक्रार महापालिकेस करावी.”