न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन मंडळाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रवाशांना भेट दिली आहे. दसऱ्यापासून फक्त पाच रुपयांत प्रवाशांना पाच किलोमीटर प्रवास करता येणार आहे. याबाबतची घोषणा बुधवारी (दि. २१) पीएमपीकडून करण्यात आली आहे. याबरोबरच नवीन मार्ग सुरू करण्यात येणार असून ‘ अटल प्रवासी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
‘ अटल प्रवासी योजना ‘ दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमार्फत लांब पल्ल्याच्या गाड्यापर्यंत पूरक प्रवासी व्यवस्था करणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी १८० गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. तर, पुणे व पिंपरी – चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पीएमपी बसेस ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
पुण्यात महापालिका मुख्य इमारत तर पिंपरी – चिंचवड शहरात चिंचवड हे मध्यवर्ती ठिकाण असणार आहे. ह्या गाड्या दर ५ मिनिटाला उपलब्ध होतील. शहरातील कमी उत्पन्न देणाऱ्या मार्गावरील बसेस बंद करून नवीन ३७ मार्गावर बसेस सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.