- आता वायसीएम रुग्णालय नॉन-कोविड करण्यास दसरा-दिवाळीचा मुहूर्त – अति. आयुक्त संतोष पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनाचा विळखा सैल झाला असून, कोविड रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय नॉन कोविड करण्याचे विचाराधीन आहे. दिवाळीनंतर रुग्णवाढीचा आलेख लक्षात घेऊन वायसीएम नॉन कोविड करण्यासंदर्भात विचार करू, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर पिंपरी – चिंचवड महापालिकेने संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोविडसाठी समर्पित केले होते. तसेच या रुग्णालयात उपचारासाठी येणारे नॉन कोविड रुग्णांसाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा आलेख कमी झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दोन हजारांच्या आत आली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालय नॉन कोविड करावे, अशी मागणी होत आहे.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ” कोरोना रुग्णांची संख्या कमी – अधिक प्रमाणावर होत आहे. गणेशोत्सव कालखंडात नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली होती दिवाळीच्या कालखंडात नियमांचे पालन झाले नाही, तर पुन्हा रुग्णवाढ होऊ शकते. त्यामुळे कोरोना विरोधात प्रशासन सज्ज असणे गरजेचे आहे. सणासुदींच्या कालखंडानंतर आढावा घेऊन वायसीएम रुग्णालय नॉन कोविड करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच नॉन कोविड रुग्णांसाठी पिंपरीतील डॉ. डी. पाटील रुग्णालयात उपचार सुविधा सुरू आहे. वायसीएम रुग्णालय नॉन कोविड करण्यासंदर्भात अंतिम निर्णय दसरा व दिवाळीच्या सणानंतर घेतला जाणार आहे.