- वाहनांच्या काचा फोडून त्यातील सामान लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेणा-या एका टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून तब्बल १८ लॅपटॉप, ३ वायफाय डोंगल, एक कॅमरा लेन्स, ७ लॅपटॉप बॅग, दोन दुचाकी असा एकूण १२ लाख ७७ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश उर्फ नाना माणिक पवार (रा. नवी मुंबई), बबन काशिनाथ चव्हाण (वय ३९, रा. ति-हे तांडा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), बसू जगदीश चव्हाण (वय ४५, रा. सुरक्षा नगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश प्रकाश चव्हाण (वय ३५, रा. अंबुजवाडी, मालवणी, मालाड, मुंबई), मारुती मानी पवार (वय ४०, रा. पाणी इपरगा तलाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) हे त्यांचे साथीदार फरार आहेत.
आरोपींनी चोरलेला माल विकत घेणा-यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अमोल साहेबराव गुंड (रा .शिवनी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), सुलेमान याकुब तांबोळी (रा. विष्णू नगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. ६ ऑक्टोबर रोजी हिंजवडी परिसरातून मिलिंद वेदव्यास राळेगावकर (वय ४८, रा. सुसगाव) यांच्या होंडा सिटी कारच्या काचा फोडून चोरट्यांनी ५० हजारांची बॅग चोरून नेली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस करीत होते.
तपास करत असताना पोलीस नाईक वासुदेव मुंडे आणि पोलीस शिपाई आदिनाथ ओंबासे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक दुचाकी संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हीची तपासणी करून दुचाकीचा शोध घेतला. ती दुचाकी आरोपी गणेश याची असल्याचे निष्पन्न झाले. गणेश हा मुंबई पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याला रबाळे, नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील सात, वाकड पोलीस ठाण्यातील तीन, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एक आणि हडपसर पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.












