- ठेकेदाराच्या निष्काळजीमुळे कामगाराने गमावली हाताची पाच बोटे…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- एमआयडीसी भोसरी येथील शार्प ऑटो प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रेस ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ऑपरेटरचा प्रेस मशीन मधून जॉब काढत असताना अपघात झाला. मशीन अचानक नादुरुस्त झाली. त्यामुळे अवजड डाई ऑपरेटरच्या हातावर पडली. त्यात त्याच्या हाताची पाच बोटे तुटली आहेत.
कंपनीने ठेकेदार सुभाष याच्याकडे मशीनच्या देखभालीचे काम दिले होते. सुभाष याने मशीनची देखभाल व्यवस्थित न केल्याने हा प्रकार घडला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता एमआयडीसी भोसरी येथील शार्प ऑटो प्रायवेट लिमिटेड या कंपनीत घडली.
राजू प्रभाकर रणदिवे (वय ४३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. शिरूर ताजबन, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे जखमी ऑपरेटरचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. २८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ठेकेदार सुभाष व्यंकटराव ढोपरे (रा. आदर्शनगर, दिघी) याच्या विरोधात कामगाराच्या सुरक्षेची काळजी घेतली नसल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.












