न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील पेठ क्रमांक २२ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेडझोन हद्दीत येत आहे. या गृहप्रकल्पातील बांधून तयार असलेल्या घरांचे त्यामुळे वाटप झालेले नाही. येथील किती क्षेत्र रेडझोन हद्दीमध्ये येत आहे, याचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिल्या.
या गृहप्रकल्पातील सदनिकांचे वाटप करण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्याने सदनिकांचे वाटप रखडले आहे. प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्याबाबतचे सर्वेक्षण भूमापन कार्यालयाकडून २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ . देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला महापालिका नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक, अन्य अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, नगर भूमापन अधिकारी, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राधिकरणाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.











