- राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाकडून अधिसूचना जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाकडून माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या सदस्यपदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळावर राज्य शासनाकडून कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कामगार नेते व महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफानभाई सय्यद, संघटनेचे जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव तर पुणे माथाडी मंडळावर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे यांच्या सदस्यपदी नियुक्त्या केल्या आहेत. माथाडी कामगारांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात असून अभिनंदन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याबाबत राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. क्र.युडल्ल्युए-२०२०/प्र.क्र.८५(भाग-१)/काम-५- महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवि कामगार(नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ (महाराष्ट्र १९६९ चा क्र. ३०) च्या (३),(५)आणि (६) तसेच महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) नियम, १९७० मधील नियम ३ च्या उप नियम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासनद्वारे या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. याबाबतचे आदेश राज्याचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांनी काढले आहेत.
याबाबत माहिती देताना इरफानभाई सय्यद म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील व जिल्ह्यातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या कार्याची राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली आहे. त्यानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पिंपरी चिंचवड व पुणे माथाडी मंडळावर सदस्यपदी नियुक्त्या केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील बहुतांश कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद आहेत. माथाडी मंडळात काम करताना या कामगारांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून माथाडी मंडळावर अध्यक्ष व सदस्याची नेमणूक न झाल्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न मंडळाकडे पडून आहेत. माथाडी मंडळातील नोंदणीकृत कामगारांना काम करताना किरकोळ अपघात व इतर कोणत्याही समस्या उद्भवल्या तरी त्याकडे मंडळ लक्ष देत नाही. कामगारांची आर्थिक कुचंबना होत आहे. त्यामुळे माथाडी कामगार मंडळांच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे इरफान सय्यद म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने माथाडी कामगार आणि असंघटित कामगारांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले असून, आंदोलनातून निर्माण झालेल्या संघटनेतील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन कामगारांचे प्रश्न मांडण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पुणे माथाडी मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या कल्याणासाठीच्या योजनांचा पाठपुरावा करणार आहे.
– मा. परेश मोरे…
कामगार नेते इरफानभाईंच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेच्या विचाराने कामगारांच्या प्रश्नासाठी झटत राहणार आहे. कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही संधी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करतो व माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडील ही ग्वाही देतो.
– मा. प्रविण जाधव…












