न्यूज पीसीएमसी नेटवर्क
अहमदनगर (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतासवाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
बिबट्या तिनं वर्षाच्या सार्थकला पळवून घेऊन जात असताना आई सुनंदाने बिबट्याचे शेपूट ओढून धरले मात्र आईचे हे प्रयत्न कमी पडले. काल रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुणांनी लाठ्या काठ्यासह सभोवतालचा सुमारे ५ किमीचा परिसर पायी पिंजून काढला परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
रात्री उशिरापर्यंत सार्थकचा शोध घेणे सुरू होते. शोध मोहिमेत वनविभाग पोलीस कर्मचारी व शेकडो तरुण सहभागी झाले होते. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी बिबट्याला ठार करण्याची मागणी केली आहे. राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही या भागास भेट दिली. येत्या दहा दिवसांत बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशा सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.












