- ‘मालमत्तांचा’ मिळकतकर माफ करावाच लागणार – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- कोरोना काळात उद्योगनगरी म्हणजेच आपल्या पिंपरी चिंचवडनगरी मधील लाखो मिळकत धारक हे आर्थिक संकटात सापडले आहेत. ९० हजार पेक्षा जास्त बाधितांना कोरोनाशी संघर्ष करावा लागला. मार्च २०२० पासूनचा ७ महिन्यांचा काळ शहरवासीयांनी जिकरीने काढला आहे. खर्चाचा वाढता डोंगर आणि कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव ह्यामुळे सहा महिन्यांचा मिळकत कर भरणे आता शहरवासीयांना अशक्यप्रायच ठरते.
ह्या कठीण काळाचा आढावा महापालिकेतील लोकनियुक्त नगरसेवकांनी केलेला असल्याने २६ ऑगस्ट २०२० रोजी उपसूचना बहुमताने मंजूर करून घेतली. त्याबाबतचा मंजूर सहा महिन्यांचा मिळकतकर माफीचा ठराव पालिकेतील कर संकलन विभागाकडे वर्ग करण्यात आला. आज रोजी त्या घटनेला २ महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. कोणताही ठराव व लोकशाहीच्या सभागृहात बहुमताने जेव्हा मंजूर केला जातो, त्या ठरावाची अंमलबजावणी तातडीने करणे क्रमप्राप्तच ठरते. करोडो रुपयांची विकासकामे जर अश्याच पद्धतीने मंजूर ठरावाप्रमाणे पार पाडली जातात. मग लोकहिताचा ठराव तातडीने का मंजूर करू शकत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
सन २००० मध्ये शहरात १५०००० म्हणजेच दीड लाख मालमत्ता होत्या. २० वर्षात त्यामध्ये तिपट्टीपेक्षा जास्त वाढ होऊन आज ५ लाखापेक्षा जास्त मिळकती शहरात अस्तित्वात आहेत. ह्या सर्व मालमत्तांना सहा महिन्यांचा मिळकत कर आता भरावा लागणार नाही. त्यासाठी महापालिकेने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. महापालिका अधिनियम कायद्याच्या नियमानुसारच लोकप्रतिनिधींनी शतकातील महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर सदरचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे सदरच्या मंजूर ठरावाचे नियोजन तात्काळ करावे लागणार आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष तथा घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले,” महापालिकेच्या मिळकत कर माफी बाबतच्या स्पष्ट निर्देशापर्यंत कोणीही एक रुपया सुद्धा मिळकत कर भरू नये. तसेच ज्यांनी या पूर्वी भरलेला असेल त्यांनी पुढील येणारा सहा महिन्यांचा मिळकत कर भरू नये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेतलेला लोकप्रतिनिधीचा निर्णय पालिका प्रशासनास बंधनकारकच ठरतो. तोच खऱ्या लोकशाहीचा पाया आहे. कारदात्यांच्याच सहा महिन्यांच्या मिळकतकर माफीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लवकरच शहराचे “प्रमुख कारभारी” हे मिळकत कर माफ झाला आहे, अशी घोषणा करून नागरिकांना गोड बातमी देतील यात शंका नाही.”


















