- तब्बल १९ मुलांकडून भरतीसाठी उकळले पैसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. नोव्हेंबर २०२०) :- लष्कर भरतीच्या परीक्षेत पास करून देतो म्हणत तरुणांना गंडवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. आरोपींनी तब्बल १९ मुलांची फसवणूक करत पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. यात लष्कराच्या भरती विभागातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वेनसिंग लालासिंग रावत (वय ४५ रा. पिंगळे वस्ती, मुंढवा, रवींद्र राठोड रा राजस्थान) आणि रिक्रुटमेंट ऑफिसमधील कर्मचारी जयदेव सिंह परिहार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथे होणाऱ्या सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत काही मुलांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेनसिंग लालासिंग रावत, रवींद्र राठोड आणि लष्करातील हवालदार जयदेव सिंह परिहार यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
















