- पालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना फतवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- शाळांमध्ये ५० टक्के मर्यादित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ हजर व्हावे. विद्यार्थी व पालकांकडून सुरू असलेल्या ऑनलाइन अभ्यासाचा आढावा घेण्यात यावा. ऑफलाइन अध्यापन प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे घेण्यात यावे. लॉगबुक अद्ययावत करावी, अशा विविध सूचना शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका व खासगी शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. सध्या शाळांमधून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी शाळांकडून आवश्यकतेनुसार शिक्षकांना शाळेत बोलावले जाते. तर, काही शाळांमध्ये सर्वच शिक्षकांना बोलाविण्यात येते.
ही परिस्थिती लक्षात घेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती तसेच इतर महत्त्वाच्या सूचना महापालिका शिक्षण विभागाकडून शहरातील महापालिकेच्या, खासगी, अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.