न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक ही कंत्राटी पद्धतीने न करता थेट महापालिका प्रशासनाकडून ११ महिन्यांच्या किंवा महापालिकेसोबत करार तत्त्वावर नेमणूक करावी, अशी मागणी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड . सागर चरण यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी आयुक्त हर्डीकर आणि राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आर्थिक दुर्बल घटकांतील सफाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीमध्ये पिळवणूक होत आहे. सद्य:स्थितीत कंत्राटी सफाई कर्मचारी हा दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहे. महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडून त्यांना अतिशय तुटपुंजे मासिक वेतन दिले जाते. तसेच, काही कंत्राटदारांनी या सफाई कर्मचाऱ्यांकडून जमा होणारे वेतनाचे बँक पासबुक आणि ए.टी.एम कार्ड स्वत:कडे ठेऊन घेतले आहे.
बँकेत वेतन जमा न करता सफाई कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार कंत्राटदार किमान वेतन न देता अतिशय तुटपुंजे वेतन देत आहे. संबंधित कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसल्याने त्याचा वारंवार फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता मनपाने इच्छुक सफाई कामगारांना ११ महिन्यांच्या किंवा मनपा नियमानुसार करारावर घेऊन कामगार कायद्यानुसार त्यांना किमान वेतन द्यावे, अशी मागणी केली.