न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- पालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेंतर्गत घर खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेमध्ये गेल्या सात महिन्यांत ४७ दिव्यांगांना एक लाख याप्रमाणे ४७ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांना त्यांचे हक्काचे घर मिळविण्यासाठी मदत झाली आहे.
महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत दिव्यांग, विशेष मुले व व्यक्ती, कुष्टपीडित व्यक्ती, सामाजिक संस्था आदींना अर्थसहाय्य दिले जाते. अपंग सार्वजनिक कल्याणकारी योजनेसाठी २७ कोटी १६ लाख रुपयांची वार्षिक आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यापैकी १ एप्रिल ते ४ नोव्हेंबर अशा सात महिन्यांच्या कालावधीत १३ कोटी २३ लाख ११ हजार २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित केले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय – अपंग पेन्शन योजनेतंर्गत ७ हजार ६४२ जणांना ८ कोटी ८१ लाख २८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. महापालिका हद्दीतील या कुष्ठपीडित व्यक्तींना सहामाही आणि वार्षिक अर्थसहाय्य दिले जाते. त्याचा आत्तापर्यंत २८८ जणांनी लाभ घेतला.