- मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांचा आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- गोरगरीब पथ विक्रेत्यांसाठी संजीवनी असलेल्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी फाईल मंजुरी आणि वाटप करायला कुदळवाडीमधे सिंडिकेट बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे. पुढील काळात निधी वाटप न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ‘फ’ प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.
देशाच्या ज्या वर्गाला कुठलीही कागदपत्रे नसल्याने कर्ज मिळत नाहीत त्यांच्या भल्यासाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. पण या योजनेला खोडा घातला जात आहे आणि बँका अशा कर्जाना द्यायला आडकाठी आणत आहेत. कुदळवाडी च्या सिंडिकेट बँकेने अशी अडवणूक सुरू केल्याच्या तक्रारी स्थानिक पथ विक्रेत्यांनी केल्या आहेत.
याचा जाब विचारायला मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी बँक अधिकाऱ्यांना भेटून त्यांना विचारणा केली आणि अशी कर्जे त्वरित मंजूर करावीत अन्यथा बँकसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पुढील काळात अशा तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता बँकेने घ्यावी असे यादव यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.