निगडीतील भक्ती शक्ती उड्डाणपूल खुले करण्यासाठी आंदोलन…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ नोव्हेंबर २०२०) :- निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने निगडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, याच मागणीसाठी केलेले हे दुसरे आंदोलन होते.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांच्या नेतृत्वाखाली भक्ती शक्ती उडाणपुलाजवळील प्राधिकरण पोलिस चौकी समोर गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले.
उड्डाणपुलाच्या उदघाटनाला दिरंगाई होत असल्याने वाहनचालकांना अडीच ते तीन किलोमीटर वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विनाकारण नागरिकांना वेठीस का धरले जाते, असा सवाल करीत या उड्डाणपुलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून काही राजकीय नेत्यांच्या हट्टासाठी हा उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नसल्याचा आरोप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी केला.