न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी कॅम्पाला पुणे – मुंबई गावासह महामार्गाला जोडणाऱ्या पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे क्रॉसिंगवर महापालिके मार्फत बांधण्यात येणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला संरक्षण खात्याकडून परवानगी देण्यात आली आहे.
संरक्षण खात्याच्या जागेपोटी महापालिकेमार्फत २८ कोटी ६८ लाख रुपये संरक्षण खात्याकडे जमा करण्यात आले असून, आता या कामासाठी व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आल्याने या पुलाच्या कामाचा विषय मार्गी लागला आहे. पुणे – मुंबई महामार्गाकडून पिंपरीगाव आणि पिंपरी कॅम्प या भागाला जोडणारा इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पूल हा एकच पूल सद्यःस्थितीत अस्तित्वात आहे. रहदारीमुळे या पुलावर एकेरी वाहतूक असल्याने हा पूल वाहतुकीस अपुरा पडत आहे.
संरक्षण खात्याकडून १७ ऑगस्ट रोजी ८ हजार ८१ चौरस मीटर एवढी जागा पूल बांधण्यासाठी महापालिकेस हस्तांतरीत करत पूल बांधण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच जागेपोटी महापालिकेने २८ कोटी ६८ लाख ७७ हजार रुपये एवढी रक्कम संरक्षण खात्याकडे जमा केली आहे. पुलाचा विषय मार्गी लागल्याने या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक यांची नियुक्ती केली जाणार आहे.