न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२०) : पोलीस कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी स्वप्नील लांडगे यांना माहिती मिळाली की, आरोपींनी बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथील एका गोडाऊनमध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा करून ठेवला आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून आरोपी दळवी यास अटक केली.
सोमवारी (दि. २३) रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच, गोडावूनमध्ये लपवून ठेवलेला गुटखा आणि टेम्पो असा १८ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दळवी याचे दोन साथीदार कोठारी आणि पाटील फरार झाले आहेत.
कार्तिक सुभाष दळवी (वय २२, सध्या रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी. मूळ रा. मोताळा, बुलढाणा), किरण कोठारी (रा. घरकुल, चिखली), गोपाल पाटील (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी आरोपी दळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.