न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज समाजप्रबोधन पर्वासाठी आयोजित कार्यक्रमाची निविदा न काढता थेट पद्धतीने काम केल्याने तीन अधिकाऱ्यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली आहे.
त्यात स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता सूर्यकांत मोहिते व लेखाधिकारी रमेशकुमार जोशी यांचा समावेश आहे. पालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रबोधन पर्व कार्यक्रमाचे आयोजन १८ ते १९ फेब्रुवारी असे २ दिवस ‘ अ ‘ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५ येथे करण्यात आले होते. त्या खर्चास या स्थायी समितीने १७ फेब्रुवारीला मंजुरी दिली. मात्र, सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात आली नाही.
कार्यक्रमापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. कार्यक्रमासाठी ५ हजारऐवजी ८ हजार आसन क्षमतेचा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे खर्चाची मर्यादा ५ लाखापेक्षा अधिक झाली. शासन नियमाचे उल्लंघन करण्यात आले असून, तरतुदीचा भंग केला आहे. त्यामुळे या ३ अधिकाऱ्यांना आयुक्त हर्डीकर यांनी सक्त समज दिली आहे. यापुढे शिस्तभंग झाल्यास दंड करण्याचा इशारा दिला आहे.


















