न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२०) :- बँकेकडे तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीची बनावट कागदपत्रे तयार करून पती – पत्नीने मिळून बँकेची तब्बल आठ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च २०१५ पासून मार्च २०१७ या कालावधीत जी. एस. महानगर को. ऑप. लिमिटेड बँकेच्या भोसरी शाखेत घडली. बाबासाहेब बाळासाहेब जासूद (वय ४९) आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बबन घमाजी सोमवंशी (वय ५१, रा. च-होली. मूळ रा. खारघर) यांनी मंगळवारी (दि. २५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जी. एस. महानगर को. ऑप. लिमिटेड बँकेच्या भोसरी शाखेतून आरोपींनी कर्ज घेतले आहे.
कर्ज घेताना बँकेकडे तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीवर कोणताही बोजा, हक्क, कब्जा नाही. तसेच त्या प्रॉपर्टीवर कोणत्याही न्यायालयात दाखल नाही, असे खोटे शपथपत्र, घोषणापत्र, बंधपत्र आणि कर्ज करार करून दिला. त्याआधारे जासूद दांपत्याने मार्च २०१५ मध्ये पाच कोटी, मार्च २०१६ मध्ये २ कोटी आणि मार्च २०१७ मध्ये एक कोटी १५ लाख रुपयांचे असे एकूण ८ कोटी १५ लाखांचे कर्ज घेतले. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन बँकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


















