- पदवीधरसाठी ६२ तर, शिक्षकसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ डिसेंबर २०२०) :- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघासाठी मंगळवार (दि. १) रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे. विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ हजार २०२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही अधिक बळकट करा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, माजी आमदार शरद पाटील, डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यात प्रमुख लढत आहे.
शिक्षक मतदारसंघात पुणे विभागात ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार प्रा. जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात प्रमुख लढत आहे. दोन्ही मतदारसंघात तिरंगी – दुरंगी लढती होणार आहेत.