- जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच करोना लसीसंदर्भातील महत्वाची माहिती दिली. देशामध्ये करोनाच्या आठ लसींवर काम सुरु असून त्यापैकी तीन भारतीय असल्याचेही मोदी म्हणालेत.
काही आठवड्यांमध्ये करोनाची लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. वैज्ञानिकांशी चर्चा झाली असून देशामध्ये सध्याच्या घडीला आठ लसींची चाचणी सुरु असल्याची माहिती मोदींनी दिली. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यास लसीकरणाला देशात सुरुवात केली जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं. एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीकरण होतं तेव्हा अनेक अफवा उठतात. या अफवा जनहीत आणि देशहीताच्या विरोधात असतात. सर्वांना मी आवाहन करतो की लोकांना या लसींसंदर्भात जागृक करा आणि ते कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
करोना लसीकरणाच्या वेळी आजारी आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे फ्रण्ट लाइनवर काम करणाऱ्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यवश्यक सेवेतील व्यक्तींना लस देताना प्राधान्य दिलं जाईल असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.
“सध्या जगभरात विविध कंपन्या करोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने जास्त आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेदेखील आहे. लसीची किंमत किती असेल? असा प्रश्न स्वाभाविक आहे. केंद्र सरकार यासंदर्भात राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल”, असे पंतप्रधान मोदींनी सांगितलं.