- प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांसह पालक हतबल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२०) :- दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. यावर्षी मात्र कोरोनामुळे शालेय साहित्यापासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत. पालिका शाळांमधील सुमारे ४० हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असून यंदा गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर यासह अन्य साहित्यापासून मुकावे न लागत आहे.
गणवेश, स्वेटर, पीटीगणवेश यासारखे शालेय साहित्य द्यायला महापालिकेला वेळ लागत असल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. सत्ताधा-यांचे राजकारण, आयुक्तांचे दुर्लक्ष आणि विरोधकांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे बोलले जात आहे.
यावर्षी शैक्षणिक साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबविली नाही. नवा ठेकेदार न घेता जुन्याच ठेकेदारांना कामे देण्यात आली. मात्र, स्थायीत त्याला विरोध झाला. महापालिका शिक्षण समितीच्या बजेटमध्ये शिक्षकांच्या धन्वंतरी स्वास्थ्य योजना, शालेय फर्निचर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य, गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर, पादत्राणे, शूज, पावसाळी साधने, दप्तर याकरिता मोठी तरतूद केलेली आहे. परंतु, या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना हे साहित्य कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.