न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना हहपार करण्यात आले. वाकड पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी याबाबतचे आदेश दिले.
पवन सुदाम मंडलीक (वय २०, रा. रहाटणी), सौरभ माळवदकर (वय २४, रा. वाकड), चंद्रकांत शंकर गुंजाळ (वय ३०, रा. थेरगाव) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. सराईत गुन्हेगारांची यादी सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.
वाकड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी मंडलीक, माळवदकर, गुंजाळ यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष माने, सहायक पोलीस फौजदार सुहास पाटोळे यांनी आरोपींना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावानुसार आरोपी यांना दोन वर्षांसाठी पिंपरी – चिंचवड व पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीतून हदपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.