न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- गोदामावर छापा टाकून ११ लाख २७ हजार ६४६ रुपयांचा गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त केला. तसेच एका आरोपीला अटक केली. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशालनगर येथे शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
अशोक नाराराम चौधरी (वय ४५, रा. विशालनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विशालनगर येथील एका गोदामात आरोपीने गुटख्याचा साठा केला असून तो त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गोदामावर छापा टाकला. त्यावेळी तेथे गुटख्याचा साठा मिळून आला.
पोलिसांनी चार लाख १० हजारांची चारचाकी, पाच हजारांचा मोबाईल आणि एक हजार ७७० रुपयांची रोकड, तसेच गुटखा असा ११ लाख २७ हजार ६४६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.