न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- एक रिक्षा, सात दुचाकी आणि तांबे, अल्युमिनियमची ६१ हजारांची भांडी असा तीन लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. इम्रान रहीम शेख (वय १९, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), अमर सुनील वाघमारे (वय १९, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस कर्मचारी स्वप्नील शेलार आणि पंकज भदाणे हे गस्तीवर असताना त्यांना एका रिक्षातून तिघेजण संशयितरित्या जाताना दिसले. रिक्षा चालकाला थांबवण्यास सांगितले. मात्र तो न थांबता पळून गेला. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करून दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता रिक्षा चोरीची असून आणखी सात दुचाकी आणि काही भांडी चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून एक रिक्षा, सात दुचाकी आणि ६१ हजार रुपये किमतीची तांबे, अल्युमिनियमची भांडी असा एकूण तीन लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला.
चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे चार गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले असून पाच दुचाकीच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.















