न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२०) :- राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह खासदार सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदींती यावेळी उपस्थिती होती.
यावेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


















