- दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; हिंजवडी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- बसमध्ये प्रवाशांसोबत वाद घालून गाेंधळ करून लुटमार करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. याप्रकरणी सात महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी महिला मुळच्या सोलापूर येथील असून, मुंबई – बेंगळुरू महामार्गावर लुटमार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली.
अर्चना मनोहर देवकर (वय ३७, रा. घाटकोपर, वेस्ट मुंबई, मूळ रा. किरपे, ता. कराड, जि. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी या कराड ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. त्याच बसने आरोपी सात महिला प्रवास करीत होत्या. दरम्यान सुतारवाडी ते राधा चाैक दरम्यान आरोपी सात महिलांनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली.
तसेच आरोपी महिलांनी फिर्यादी यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने असलेली पर्स, १० हजारांची रोकड, तसेच सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण एक लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज हिसका मारून जबरदस्तीने घेऊन पळून जात होते. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर धाव घेत आरोपी महिलांना ताब्यात घेतले.














