- नाट्य व सांस्कृतिक व्यवस्थापक संघाच्या मागणीस यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- कोरोना काळामध्ये जोपर्यंत प्रेक्षागृहातील प्रेक्षक संख्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे तोपर्यंत महापालिकेच्या सर्व नाट्यगृहांसाठी आकारण्यात येणा-या भाडे दरात ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे आता निव्वळ भाड्यापोटी वस्तूसेवा करासह २५३७ रुपये सवलतीचा दर आकारण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे दि. १४ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कंटेन्मेंट झोनच्या बाहेर दि. ५ नोव्हेंबर पासून सिनेमागृह आणि प्रेक्षागृह त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना काळामध्ये जोपर्यंत प्रेक्षागृहातील प्रेक्षक संख्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे तोपर्यंत नाट्यगृहांच्या भाडेदरात सवलत देण्याची मागणी नाट्य व सांस्कृतिक व्यवस्थापक संघाने केली होती. स्थायी समितीसमोर सवलतीच्या दराबाबतचा विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आला होता. स्थायी समितीने सर्व नाट्यगृहांसाठी ७५ टक्के सवलतीचे भाडेदर आकारण्याच्या या विषयाला मंजूरी दिली. कोरोना काळामध्ये प्रेक्षागृहाची प्रेक्षक संख्या ५० टक्के मर्यादित ठेवण्यात आली आहे तोपर्यंत अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत महापालिकेच्या भाडेदर २५३७ रुपये आकारण्यात येणार आहे.














