- वाहनतळाचा होतोय अनधिकृत वापर…
- गुन्हे दाखल करुन पालिकेचे बुडीत उत्पन्न वसूल करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ अ ‘ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत से.क्र.२३ वाहतूकनगरी येथे महानगरपालिकेच्या वतीने वाहनतळ उभारण्यात आलेले आहे. हे वाहनतळ भाडेतत्वावर चालविण्यासाठी देणेबाबत निविदा प्रक्रिया चालू आहे. सोमवारी (दि. १४) रोजी दुपारी २.०० वाजता या वाहनतळास उपमहापौर केशव घोळवे आणि नगरसेविका अनुराधा गोरखे तसेच क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, लिपिक संतोष बोत्रे आदींनी समक्ष भेट दिली.
त्यावेळी तेथे विनापरवाना बेकायदेशीरपणे वाहनतळामध्ये वाहने पार्किंग केली जाते. तसेच सर्व वाहनधारकांकडून अनधिकृतपणे ५० ते १०० रुपये वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही मनपाची जागा ही सन २०१५ मध्ये वाहनतळ पार्किंगसाठी विकसित केलेली आहे. तसेच या वाहनतळाबाबत संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावीत. मनपाचे संबंधित अधिकारी यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच सन २०१५ पासून ते २०२० पर्यंत वाहनतळावर अनधिकृत वाहन पार्किंगचे जे काही अनधिकृतपणे उत्पन्न झालेले आहे, ते सर्व उत्पन्न तातडीने महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात यावे, अशी मागणी उपमहापौर केशव हनुमंत घोळवे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.














