- फिर्यादीवर देखील दगड भिरकावला; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पगार न दिल्याने कामगाराने कंपनीच्या दोन कारची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. १५) सकाळी दहाच्या सुमारास चिखली येथे घडली. रामदास रंगनाथ वाघले (५५, रा. आदर्शनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याप्रकरणी श्रीनिवास त्रिंबक साठे (७९, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाघले याने फिर्यादी यांच्याकडे आठ दिवसांचा पगार मागितला. त्यावर साठे यांनी कंपनीतील कोणत्याच कामगाराचा पगार झाला नाही. त्यांचे पगार झाले की, मी तुमचा पगार तुम्हाला देतो, असे सांगितले.
त्यामुळे चिडलेल्या वाघले याने कंपनीच्या दोन कारच्या काचा फोडून नुकसान केले. त्या वेळी साठे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता वाघले याने त्यांच्या दिशेने दगड फेकून मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.














