न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- मौजमजेसाठी दुचाकी वाहने आणि मोबाईल फोन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी व सहा चोरीचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले. चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.
विरेंद्र ऊर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय २२, रा. चिंचवडे कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड), आशिष ओमप्रकाश परदेशी (वय २०, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक त्यांच्या पथकासह चिंचवड परिसरात गस्त घालत होते. चिंतामणी चौकाजवळील मोकळ्या मैदानात दोन तरुण संशयितरित्या फिरत असून, त्यांच्याकडे दुचाकी आहे. अशी माहिती गस्तीवरील पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी वीरेंद्र आणि आशिष यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली. दोघांनी मिळून वाल्हेकरवाडी, निगडी, चिंचवड येथून दुचाकी चोरी केल्या आहेत. तसेच चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरातून मोबाईल फोन चारल्याची कबुली त्यांनी दिली.















