- पिंपरीतील साई चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचा-यांचीही होणार चौकशी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने लाच स्वीकारली. संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी वरिष्ठांना अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर महिला पोलिसास निलंबित करण्यात आले.
स्वाती सोन्नर असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत. पिंपरी येथील साई चौक येथे मंगळवारी काही पोलीस वाहतूक नियमन करीत होते. त्या वेळी दोन महिलांना सोन्नर यांनी थांबविले होते. त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले, त्यात त्या वाहनचालकांकडून खिशात पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
याप्रकरणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपायुक्तांनी गुरुवारी सायंकाळी स्वाती सोन्नर यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यानुसार महिला वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यावेळी साई चौक येथे वाहतूक नियमन करीत असलेल्या इतर कर्मचा-यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.















