- ट्रायथॅलॉन स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण करणाऱ्या पोलिस आयुक्तांचा होणार सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २० डिसेंबर रोजी सायकल फेरी (सायक्लोथॉन) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
India Cycle 4 Change challenge (‘स्वच्छ भारत – स्वस्थ भारत’) या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये हवा-ध्वनी प्रदुषण टाळून-इंधन बचतीबरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालवणेची गरज व महत्व पटवून देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची सायकल फेरी (सायक्लोथॉन) सांगवी फाटा ते साई चौक (जगताप डेअरी) ते सांगवी फाटा या बीआरटीएस मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मनपा व लायन्स या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या संयुक्त सहभागाने सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समाजात विशेषतः आजच्या तरूण पिढीमध्ये कोव्हीड साथीच्या काळात व्यायामाचे महत्व त्याच बरोबर इंधन बचतीचा संदेश रूजवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायकल फेरीचे (सायक्लोथॉन) उद्घाटन चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप व महापौर उषाताई उर्फ माई ढोरे, आयुक्त, पिं.चिं.मनपा, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, व कमांडंट ३३० इंन्फास्ट्री ब्रिग्रेड व लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Iron Man) यांचा आंतरराष्ट्रीय ट्रायथॅलॉन स्पर्धा पुर्ण केल्याबाबत सत्कार करण्यात येणार असून वेणुगोपाल राव, व जय पाठक आणि श्रीपाद शिरोडे व अरूण पोटे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, बीआरटीएस विभाग तसेच इतर विभागाचे सर्व अधिकारी व स्थानिक नगरसदस्य व लायन्स क्लब प्रयत्नशिल आहे.
कार्यक्रमास पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातील सायकल क्लब सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर पिंपरी चिंचवडकरांनी सहभाग नोंदवून उर्जा बचत व हवा-ध्वनी प्रदुषण टाळून-इंधन बचतीचा संदेश समाजात रूजवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.