- शहर मनसेचे पालिका आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२०) :- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम दापोडी ते पिंपरी हे अंतिम टप्प्यात आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या दृष्टीने मेट्रो लाईन १ ही निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत अत्यंत आवश्यक आहे.
त्याला अनुसरून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पिंपरी ते निगडी प्रकल्प अहवाल मार्च २०१९ रोजी मान्यता देण्यात आलेली असून, तो प्रकल्प अहवाल राज्य शासन व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी व मंजुरीसाठी पाठविण्यात आला. या प्रकल्प अहवालाची राज्य शासनाच्या मंजुरीनंतर दोन वर्ष केंद्र शासनाची मंजुरी आवश्यक आहे. परंतु ती झालेली नाही. हा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या दरबारी पडून असून, त्याचा पालिका आयुक्तांनी पाठपुरावा करावा व तो मंजूर करून घेण्यात यावा, अशी मागणी मनसेचे गटनेते तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या दोन ते चार वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निगडीपर्यंत मेट्रो पहिल्याच टप्प्यात व्हावी यासाठी आग्रही आहे. तत्काळ यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिला आहे.
या प्रसंगी मनसेचे राजू सावळे, हेमंत डांगे, बाळा दानवले, दत्ता देवतरसे, सुशांत साळवे, तुकाराम शिंदे, चंद्रकांत दानवले, निलेश नेटके, रोहित काळभोर, जय सकट, राजू भालेराव व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.














