- संस्था-संघटनांना फलक लावण्यास देखील मनाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी येत्या १ जानेवारीला होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमसाठी केवळ पास असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य नागरिकांना या ठिकाणी येण्यास निर्बंध घालण्यात आले असून कोणत्याही संस्था आणि संघटनांना या ठिकाणी फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विविध संघटनांची बुधवारी (दि. २३) बैठक झाली. या बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता भिख्खू संघाच्या उपस्थित धम्म वंदना होणार आहे. १ जानेवारीला धम्मदेसना बुद्ध वंदना, समता सैनिक दलाचे संचलन, मान्यवरांकडून विजयस्तंभाला अभिवादन करण्यात येईल. १ जानेवारी रोजी दुपारी १२ पर्यंत हे कार्यक्रम होतील. पास असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. अन्य नागरिकांना या ठिकाणी जाण्यास निर्बंध असल्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डबाळे यांनी सांगितले.