- नववर्षाच्या मुहूर्तावर पर्यटकांचा हिरमोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून रात्र जमावबंदी लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी प्रसृत केले. त्यानुसार शुक्रवारपासून (२५ डिसेंबर) ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी या नगर परिषदांचा भाग, तळेगाव आणि चाकण औद्योगिक वसाहत, हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क या भागात २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत रात्र जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच लोणावळा, अॅम्बी व्हॅली, लवासा, भुशी धरण, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड रस्ता, खडकवासला या पर्यटनस्थळांसह मावळ, मुळशी आणि हवेली तालुके , याशिवाय विविध फार्म हाऊस, निवासस्थाने (रिसॉर्ट) या ठिकाणी नाताळ आणि नववर्षांनिमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथेही रात्र जमावबंदी लागू करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.