- राज्यभरात केवळ १५ रुपयात होतोय ७/१२ डाउनलोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०२०) :- महसूल विभागाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पातील डिजिटल स्वाक्षरीत जमिनीचे अधिकार राज्यातील सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहेत. तयार केलेल्या महाभूमी पोर्टलवर आता स्टेट बँक ऑफ इंडियासोबतच बँक ऑफ बडोदाचे आणखी एक पेमेंट गेटवे उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला एक पेमेंट गेटवे निवडण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे.
गेल्या काही महिन्यात शासनाच्या डिजिटल स्वाक्षरीत सातबा-याला पुणे, मुंबई, ठाणे नाशिकसह संपूर्ण राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या दररोज सुमारे ३० ते ३५ हजार डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खातेउतारे डाऊनलोड करून सामान्य नागरिक वापरू लागले आहेत. तसेच शासनाने हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी ग्राह्य राहतील, असे जाहीर केले.
त्यामुळे नागरिकांचा वेळ, व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. आता फक्त १५ रुपये भरा व राज्यातील कोणताही ७/१२ आपण डाउनलोड करु शकता. या दोन्ही पेमेंट गेटवेवरून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, भीम अॅपद्वारे आपले महाभूमीचे खाते रिचार्ज करता येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना अत्यंत सोप्या पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा व खातेउतारे उपलब्ध होतील.


















