- सांगवी पोलिसांकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२०) :- सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे सोमवारी (दि. ३) दुपारी अचानक लागलेल्या आगीत ३१ दुचाकी व वाहने जळून खाक झाली होत्या. विविध कारवायांमध्ये सांगवी पोलिसांनी या दुचाकी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक विनायक विठ्ठल डोळस यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या जप्त केलेल्या अशा दुचाकी आगीत खाक होण्याची घटना डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात घडली होती. या घटनेला १५ दिवस होत नाहीत तोवर सोमवारी पुन्हा दुचाकी आगीत खाक झाल्याचा प्रकार घडला होता. सांगवी पोलीस या मागचे धागेदोरे तपासत आहेत.