- एकूण ३६६४ सदनिकांसाठी ४७८०१ अर्ज पात्र..
- फेसबुक व युट्यूबव्दारे होणार प्रकल्पाची सोडत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी च-होली, रावेत व बो-हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेस महापालिका सभेने ठराव क्र. ५१९, दि. २६/१२/२०२० अन्वये मान्यता दिलेली आहे.
या योजनेसाठी दि. १७/०८/२०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले आहेत. या योजनेकरीता एकूण ४७८७८ इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४७८०१ अर्ज पात्र ठरलेले आहेत. चऱ्होलीतील प्रकल्पात १४४२, रावेत ९३४, बो-हाडेवाडी १२८८ अशा एकूण तीन गृहप्रकल्पात ३६६४ सदनिका उपलब्ध आहेत.
या योजनेकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरक्षण असेल. या योजनेकरीता ३६६४ सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमत १० टक्के स्वहिस्सा भरावा लागेल. या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook पेजवर Live व YouTube व्दारे दाखविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी करु नये.
सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात यईल. या प्रकल्पाची सोडत दि. ११/०१/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे आमदार तथा माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे या राहतील. विशेष उपस्थिती आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे तसेच प्रमुख उपस्थिती खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार आण्णा बनसोडे यांची असेल.


















